Translate

गुरुवार, २२ मार्च, २०१८

स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव


‘इंडिपेक्स ७३’ या नावानी भरविण्यात आलेल्या भारतीय पोस्टाच्या तिकीटांच्या प्रदर्शनासाठी एक अतिशय सुंदर असे बोधचिन्ह तयार करण्यात आले होते. ह्या बोधचिन्हाच्या चित्राचे पोस्टाचे तिकीट काढण्यात येऊन या उपक्रमाचे अभिनंदन करण्यात आले. ८ जानेवारी १९७३ रोजी प्रकाशित केलेल्या या तिकीटाची छपाई चार रंगात केलेली असून त्यावर सोनेरी वर्खाने सजविले आहे. या तिकीटाची किंमत १ रुपया ४५ पैसे आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून २५ वर्षे पूर्ण झाल्याबदद्ल रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला. या रौप्य महोत्सवी आनंदाप्रीत्यर्थ भारत सरकारने दोन तिकीटांची मालिका प्रस्तुत केली. त्यापैकी एका तिकिटावर भारतीय परंपरागत पद्धतीची रचनाचित्र दाखविण्यात आली असून चार रंगात छपाई करण्यात आलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे.




१ लाखावे पोस्ट कार्यालय


भारतीय पोस्ट खात्यातर्फे प्रत्येक शहरात आणि खेडेगावात लोंकाच्या दळणवळणाच्या सोयीसाठी पोस्ट कार्यालयांची निर्मिती केली गेली. १ जुलै १९६८ रोजी १ लाखाव्या पोस्ट कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले त्यानिमित्त पोस्टाचे तिकीट काढून गौरव करण्यात आला. लाल, निळ्या आणि काळ्या रंगात या तिकीटाची छपाई करण्यात आली असून २० पैसे त्याची किंमत आहे. हरितक्रांतीच्या प्रकल्पामुळे गव्हाच्या निर्मितीत चांगली वाढ झाली.  ह्याचे कौतुक करण्यासाठी भारत सरकारने गव्हाच्या लोंब्या आणि अॅग्री रिसर्च इन्स्टिट्यूटचे चित्र असलेले तिकीट १७ जुलै १९६८ रोजी प्रकाशित केले. हिरवट निळसर आणि नारंगी ब्राऊन रंगात या तिकीटाची छपाई किली असून २० पैसे यांची किंमत आहे.



थीरू अण्णादुराई


सी सी आय आर कम्युनिकेशनच्या १२ व्या जागतिक संमेलनानिमित्त भारत सरकारने पृथ्वीचा गोल आणि त्यांचे बोधचिन्ह असलेले चित्र टाकून २१ जानेवारी १९७० रोजी तिकीट प्रकाशित केले. पर्शियन ब्ल्यु रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे. प्रसिद्ध राजनीतिज्ञ थीरू अण्णादुराई यांच्या पहिल्या पुण्यतीथी निमित्त त्यांचे छायाचित्र असलेले तिकीट फेब्रुवारी १९७० या दिवशी प्रकाशित करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रसिद्ध प्रकाशक मुन्शी नवल किशोर यांच्या स्मरणार्थ १९ फेब्रुवारी १९७० रोजी तिकीट प्रकाशित करण्यात आले असून मुन्शी नवल किशोर यांचे छायाचित्र आणि प्रिंटींग फ्लांन्ट असे चित्र छापण्यात आले आहे. लालसर ब्राऊन रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे.




मॅक्झिम गोर्की, अमृत बझार


व्यवसाय आणि त्यातील प्रगती या विषयावर युनायटेड नेशन्सतर्फे संमेलन घेण्यात आले. त्याचे अभिनंदन करण्यासाठी १ फेब्रुवारी १९६८ रोजी युनायटेड नेशन्सचे सांकेतिक चिन्ह, विमान आणि जहाज ही चिन्ह टाकून तिकीट प्रकाशित करण्यात आले. हिरवट निळसर रंगातील या तिकीटाची किंमत १५ पैसे आहे. ‘अमृत बझार पत्रिका’ या वर्तमानपत्राला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या शतक महोत्सवानिमित्त २० फेब्रुवारी १९६८ रोजी पोस्टाचे तिकीट काढून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सेपिया, नारिंगी पिवळ्या रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत १५ पैसे आहे. २८ मार्च १९६८ रोजी मॅक्झिम गोर्की यांच्या स्मरणार्थ तिकीट काढण्यात आले असून प्लम रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत १५ पैसे आहे.




२१ वे राष्ट्रमंडल सम्मेलन


२१ व्या राष्ट्रमंडल संसदीय संम्मेलन, नवी दिल्ली यांच्या गौरवार्थ २८ ऑक्टोबर, १९७५ रोजी हे तिकीट प्रकाशित करण्यात आले. ऑलिव्ह ग्रीन आणि काळ्या रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २ रुपये आहे. भारताचे लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांच्या जन्म शताब्दी निमित्ताने ३१ ऑक्टोबर, १९७५ रोजी वल्लभभाई पटेल यांच्या गौरवार्थ त्यांचे छायाचित्र असलेले तिकीट प्रकाशित करण्यात आले. हिरवट रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. राजकीय नेते नवीनचंद्र बरदलै यांच्या जन्मशताब्दी निमित्त ३ नोव्हेंबर, १९७५ रोजी त्यांच्या छायाचित्राचे तिकीट प्रकाशित करण्यात आले असून लालसर ब्राऊन रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे.




मार्कोनी


मतिमंद मुलांना सहयोग करण्यासाठी या तिकीटाची निर्मिती ८ डिसेंबर १९७४ रोजी करण्यात आली. मतिमंदांसाठी एक सांकेतिक बोधचिन्ह असलेले हे तिकीट नारंगी आणि काळ्या रंगात छापलेले असून त्याची किंमत २५ पैसे आहे. रेडिओचे संशोधक मार्कोनी यांच्या जन्मशताब्दीबद्दल हे तिकीट १२ डिसेंबर १९७४ रोजी प्रकाशित करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांचे छायाचित्र असलेले हे तिकीट गडद हिरवट रंगात छापण्यात आले असून त्यांची किंमत २ रुपये आहे. सेंट फ्रान्सिस झेविअर्स यांच्या स्मरणार्थ २४ डिसेंबर १९७४ रोजी तिकीट प्रकाशित करण्यात आले असून चार रंगात छपाई असलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे.