Translate

शनिवार, ७ एप्रिल, २०१८

ब्रिटीश शास्त्रज्ञ मेरी क्युरी


‘रेडियम’ चा शोध आणि वैद्यकिय व्यवसायात क्रांती घडवून आणणारा ‘क्ष’ किरणांचा शोध लावणाऱ्या प्रसिद्ध ब्रिटीश शास्त्रज्ञ मेरी क्युरी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने भारत सरकारने या ब्रिटीश शास्त्रज्ञ महिलेच्या छायाचित्राचे तिकीट ६ नोव्हेंबर १९६८ रोजी प्रकाशित करून त्यांचा गौरव केला. काळसर जांभळ्या रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे. १ डिसेंबर १९६८ रोजी आंतरराष्ट्रीय भौगोलिक कॉग्रेस या संस्थेसाठी जगाचा नकाशा असलेले तिकीट काढण्यात आले. हे न्यू ब्लू रंगात छापलेले असून २० पैसे किमतीचे तिकीट आहे. कोचिन येथील ज्यू लोकांच्या उपासना स्थानाला ४०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यासाठी आदर व्यक्त करण्यासाठी १५ डिसेंबर १९६८ ला कोचिन सिनागोगचे छायाचित्र टाकून तिकीट प्रकाशित करण्यात आले. कारमाइन आणि निळसर रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे.




आजाद हिंद सेनेची २५ वर्षे


क्रांतिकारक भगतसिंग यांच्या ६१ व्या जन्मतीथीच्या स्मरणार्थ भारत सरकारने १९ ऑक्टोबर १९६८ रोजी त्यांचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट प्रकाशित करून त्यांना आदरांजली अर्पण केली. पिवळ्या आणि ब्राऊन रंगात हे छापलेले असून २० पैसे ह्याची किंमत आहे. २१ ऑक्टोबर १९६८ रोजी आझाद हिंद सेनेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पोस्टाचे तिकीट प्रकाशित करून सन्मान करण्यात आले. गडद निळ्या रंगातील या तिकीटाची किंमत २० पैसे आहे. स्वामी विवेकानंदांच्या धर्मकन्या भगिनी निवेदिता यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे छायाचित्र असलेले तिकीट २७ ऑक्टोबर १९६८ साली प्रकाशित करण्यात येऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली.गडद निळसर रंगातील या तिकीटाची किंमत २० पैसे आहे.



विश्व डाक संघाची शताब्दी


विश्व डाक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याबदद्ल ३ ऑक्टोबर १९७४ साली भारत सरकारने त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तीन तिकिटांची मालिका प्रकाशित केली. विश्व डाक संघाचे बोधचिन्ह असलेले पहिले तिकीट या निमित्ताने प्रकाशित केले. जांभळट निळसर काळ्या रंगात या तिकीटाची छपाई केली असून त्याची किंमत २५ पैसे आहे. मधुबनी येथील लोखाह्स्तकलेचा नमुना असलेले दुसरे तिकीट प्रकाशित करण्यात आले. चार रंगात छपाई असलेल्या या तिकीटाची किंमत १ रुपया आहे. यातील तिसरे तिकीट हे चार रंगात बाणांनी आणि पट्यांनी काढलेल्या स्वस्तिकाचे असून चार रंगात छपाई केलेल्या या तिकीटाची किंमत २ रुपये आहे.




जतींद्रनाथ मुखर्जी, ईश्वरचंद्र विद्यासागर, श्रीनिवास शास्त्री


जतींद्रनाथ मुखर्जी यांच्या स्मरणार्थ ३१ ऑगस्ट १९७० रोजी तिकीट प्रकाशित करण्यात आले. चॉकलेटी रंगाची छपाई असलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे. शिक्षणतज्ञ श्रीनिवास शास्त्री यांच्या स्मरणार्थ २२ सप्टेंबर १९७० रोजी पोस्टाचे तिकीट प्रकाशित करण्यात आले. पिवळसर ब्राऊन रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे. शिक्षणतज्ज्ञ ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ५० व्या जयंती निमित्ताने २६ सप्टेंबर १९७० रोजी तिकीट काढण्यात येऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. जांभळट- ब्राऊन रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे.




विष्णु दिगंबर पलुस्कर, डॉ. हानसेन


भारतीय संगीताचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे छायाचित्र असलेले तिकीट हे या जेष्ठांच्या मालिकेतील दुसरे तिकीट प्रकाशित करण्यात आले. जन्म
शताब्दीबद्दल त्यांना आदरांजली वाहण्यात आली. लालसर ब्राऊन रंगात छापलेले हे तिकीट ३० पैसे किमतीचे आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. हानसेन यांचे छायाचित्र असलेले हे तिकीट त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने या मालिकेत प्रकाशित करण्यात आले. गडद ब्राऊन रंगातील या तिकीटाची किंमत ५० पैसे आहे.



आंतरराष्ट्रीय महिला वर्ष


आंतरराष्ट्रीय महिला वर्षानिमित्त तिकीट प्रकाशित करून या वर्षाचा गौरव करण्यात आला. दोन कबुत्तर महिलेच्या हातून मोकळी सोद्तानाचे छायाचित्र असून चार रंगात छपाई केलेले हे तिकीट १६ फेब्रुवारी १९७५ रोजी प्रकाशित करण्यात आले. या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. ‘इंडियन आर्मी ऑर्डनन्स कॉर्पोरेशन’ यांच्या द्विवार्षिकमहोत्सवानिमित्त तीन तोफांचे चित्र असलेले तिकीट ८ एप्रिल, १९७५ रोजी प्रकाशित करण्यात आले. चार रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. आर्य समाज चळवळीला १०० वर्ष पूर्ण झाल्याबदद्ल ११ एप्रिल १९७५ रोजी तिकीट प्रकाशित करून आर्य समाजाचे अभिनंदन करण्यात आले. चाररंगी छपाई असलेल्या या तिकीटावर यज्ञाचे चित्र असून २५ पैसे त्याची किंमत आहे.



मानवी हक्क संरक्षण वर्ष

स्काऊट चळवळीला ६० वर्षे पूर्ण झाल्याबदद्ल त्याच्या हिरक महोत्सवानिमित्त २७ डिसेंबर, १९६७ रोजी स्काऊटचे सांकेतिक चिन्ह बिगुल आणि सॅल्युट करणाऱ्या हाताचे चित्र टाकून पोस्टाचे तिकीट प्रकाशित करण्यात आले. विटकरी रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत १५ पैसे आहे. १९६८ हे साल जगभर मानवी हक्क संरक्षण वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. त्यानिमित्ताने १ जानेवारी १९६८ या दिवशी तिकीट प्रकाशित करण्यात आले. चार व्यक्ती पृथ्वीचा गोल हातात धरून संरक्षण करत आहेत आणि वरच्या कोपऱ्यात मानवी हक्क संरक्षण संस्थेचे सांकेतिक चिन्ह टाकून गडद हिरव्या रंगात हे तिकीट छापण्यात आले आहे. त्याची किंमत १५ पैसे आहे. ३ जानेवारी १९६८ रोजी तमिळ भाषिकांचे आंतरराष्ट्रीय संमेलन (मद्रास) चेन्नई येथे घेण्यात आले. त्यानिमित्त काढण्यात आलेल्या तिकिटावर संमेलन सांकेतिक चिन्ह आणि गोपुरम् मंदिराचे छायाचित्र छापण्यात आले आहे. या तिकीटाची किंमत १५ पैसे आहे.